भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून पर्यावरण संरक्षण आणि उत्तम आरोग्याचा संदेश देत गोंदिया शहराचे नगराध्यक्ष सचिन शेंडे, घनश्याम उईके, उद्यभान निर्वाण, मनोज बिसेन हे ४ जण गोंदिया वरून पंढरपूरपर्यंत सायकल वारी करत जाणार आहेत. ४ ते ५ दिवसांत सायकल चालवत पंढरपूरला पोहोचून ते विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. महाराष्ट्रात गोंदिया पासून पंढरपूर पर्यंत सायकल चालवणारे सचिन शेंडे हे राज्यातील असे सकारात्मक प्रयत्न करणारे पहिले लोकप्रतिनिधी ठरणार आहेत. काही महिन्यांपूर्वी ते ‘गोंदिया सायकलिंग संडे’ या ग्रुपशी जुडले आणि. सायकल चालवण्याची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी या ग्रुपसोबत नियमित सायकलिंग सुरू केले. त्याच ग्रुपच्या प्रेरणेतून त्यांनी ही पंढरपूर वारी सायकल ने करण्याचा संकल्प केला आहे. आणि आज सकाळी ६ वाजता जयस्तंभ चौक येथून नगराध्यक्ष सचिन शेंडे आणि त्यांचे तीन सहकारी सायकलवरून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.
प्रवासादरम्यान वाटेत येणाºया गावांमध्ये ते नागरिकांना पर्यावरण रक्षण, प्लास्टिक बंदी आणि नियमित सायकलिंगचे आरोग्यदायी फायदे याबाबत जण जागृती करणार आहेत. सायकल हे प्रदूषणमुक्त, स्वस्त आणि आरोग्यासाठी उपयुक्त साधन आहे, असा संदेश त्यांचा आहे. नगराध्यक्ष शेंडे म्हणाले की, आधुनिक धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. सायकल मुळे तंदुरुस्तीही राहते आणि पर्यावरणालाही हानी होत नाही. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारी ही वारी आषाढी एकादशीच्या पवित्र परंपरेला जोडणारी असून तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. गोंदिया ते पंढरपूर हा सुमारे ८०० किमीचा प्रवास ते ४ ते ५ दिवसांत पूर्ण करणार आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. पंढरपूरला पोहोचल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन ते ही वारी पूर्ण करणार आहेत.