
वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा ‘जेलभरो’ आंदोलन छेडू; डॉ. नेपाल रंगारी यांचा इशारा
दोन मृत्यू, एक महिला अपंग झाल्यानंतरही वन विभाग निष्क्रिय?; शेतकरी, शेतमजुरांमध्ये तीव्र भीती
साकोली : नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आमगाव बु. येथे शनिवारी 45 वर्षीय शेतकरी हरिश्चंद्र श्रीराम मडावी यांच्यावर झालेल्या हल्ल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे या परिसरातील ही सलग चौथी घटना असून यापूर्वी उमरझरी, बामपेवाडा व आमगाव परिसरात घडलेल्या घटनांमध्ये एका महिला व एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, तर एका महिलेला कायमचे अपंगत्व आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “या घटनेनंतर आठ दिवसांच्या आत संबंधित वाघाला पकडण्यात किंवा त्याचा बंदोबस्त करण्यात वन विभाग अपयशी ठरल्यास प्रशासनाविरोधात भव्य जेलभरो आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला आहे.

उमरझरी येथील घटनेनंतर झालेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी वन विभागाने वाघ पकडण्यासाठी महिनाभर मोठे अभियान राबवून लाखो रुपयांचा निधी खर्च केला, मात्र आजतागायत वाघ पकडण्यात अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र श्रीराम मडावी हे शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आमगाव बु. येथील स्वतःच्या शेतात चार ते पाच महिला मजुरांसोबत तुरी लागवडीसाठी धुरे तयार करण्याचे काम करत होते. त्याचवेळी ते शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले असता गावालगतच्या वनक्षेत्रातून दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घालत हल्ला चढविला. अनपेक्षित हल्ल्यामुळे मडावी यांनी मोठ्याने आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेतात काम करणाऱ्या महिला मजूर व इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड सुरू केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मडावी यांनी तत्काळ आपल्या मुलाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेद्वारे साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉ. भास्कर गायधनी, डॉ. रुपेश बडवाईक आणि डॉ. कृष्णा मेश्राम यांनी त्यांच्यावर उपचार केले. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र अधिकारी नरेंद्र सावंत, आरएफओ कटरे व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच भाजपा महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. माहेश्वरी हेमराज नेवारे यांनीही रुग्णालयात भेट देऊन जखमी शेतकऱ्याची विचारपूस केली व कुटुंबीयांना धीर दिला.
दरम्यान, डॉ. नेपाल रंगारी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी शेतकऱ्याची विचारपूस केल्यानंतर वन विभागाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. “सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी, महिला शेतमजूर आणि मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात शेतात काम करत आहेत. संबंधित वाघाचा वावर गावालगतच्या वनक्षेत्रात असून तो वारंवार मानवी वस्तीकडे येऊन हल्ले करत आहे. आम्ही यापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले तेव्हा प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले; मात्र वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयश आले. आता आणखी निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. सलग चार घटनांनंतरही प्रभावी उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून प्रभावित भागात तातडीने गस्त वाढवावी, विशेष पथके तैनात करावीत, वाघाला पकडावे तसेच जखमी हरिश्चंद्र श्रीराम मडावी यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाढत्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतीच्या हंगामात शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली वावरत आहे.