
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : मृग नक्षत्र संपूनही अद्याप पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे. या बिकट परिस्थितीत वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि गावात समाधानकारक पाऊस पडू दे यासाठी जुन्या पिढीच्या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. तालुक्यातील दांडेगाव येथे काल, २३ जून रोजी संपूर्ण गावकºयांच्या उपस्थितीत ‘बावला-बावलीचा’ (बाहुला-बाहुली) अनोखा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. पाऊस लांबणीवर पडल्यास देव पावतो, या श्रद्धेतून गावकºयांनी गेल्या वर्षापासून सुरू केलेली ही प्रथा यंदाही मोठ्या उत्साहात जपली.
चारचाकीवरून निघाली ‘गुलाबराव’ची वाजतगाजत वरात!
मंगळवारी, २३ जून रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता या विवाहाची लगबग सुरू झाली. या अनोख्या लग्नात बाहुल्याचे नाव ‘गुलाबराव’ तर बाहुलीचे नाव ‘फुलवंती’ ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, नवरदेव ‘गुलाबराव’ ची चक्क चारचाकी गाडीवरून गावातून वाजतगाजत वरात काढण्यात आली. या वरातीत गावातील अबालवृद्धांपासून ते नवतरुणांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला आणि पारंपरिक गाण्यांवर ठेका धरला. विवाह सोहळा संपन्न होताच उपस्थित सर्वांसाठी अन्नदानाचे (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येत वरुणराजाला “लवकर ये आणि धरणीमाता सुजलाम् सुफलाम् कर,” असे सामूहिक साकडे घातले.
प्रमुख उपस्थितांची लाभली साथ
या आगळ्यावेगळ्या आणि पारंपरिक सोहळ्याचे नेटके नियोजन गावकºयांनी केले होते. या सोहळ्याला दांडेगावचे उपसरपंच मुरलीधर वावरे, कृष्णा सावरकर, विनोद राऊत, आसाराम नखाते, वाल्मीक लोहारे, रवींद्र घाटे, एकनाथ मेंढे, मंगला दांडेकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
गावकºयांची भावना
“पूर्वीच्या काळी जेव्हा पाऊस उशिरा यायचा, तेव्हा आमचे पूर्वज हा प्रयोग करायचे आणि पाऊस पडायचा, अशी आमची गाढ श्रद्धा आहे. विज्ञान कितीही पुढे गेले, तरी निसगार्पुढे आपण हतबल आहोत. म्हणूनच वरुणराजाला आळवण्यासाठी आणि बळीराजाच्या डोळ्यांतील पाणी पुसण्यासाठी आम्ही संपूर्ण गावाने एकत्र येत हा लग्न सोहळा साजरा केला आहे.”