वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा २ दिवसांनी मृतदेह सापडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गोंदिया:- आमगाव तालुक्यातील आसोली गावालगच्या नाल्यावरील पुलावरून पावसाचे पाणी वाहत असताना दुचाकीसह वाहून गेलेल्या एका शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनी आज आढळूून आला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी या पुलाच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सायंकाळी दरम्यान आसोली गावाजवळ नाल्यावरील पुलावरून पावसाचे पाणी मोठ्या वेगाने वाहत होते. त्यावेळी आमगाव तालुक्यातील जांभुरटोला येथील रूपचंद प्रेमिलाल बोपचे वय ४३ हे शेतीच्या कामानिमित्त दुचाकीने जात होते. पाणी आणि चिखलामुळे पुलावर त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. घटना कळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र नाल्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने आणि अंधार पडल्याने शोधकार्यात अडचणी आल्या.

२ दिवसांनी मृतदेहाचा शोध
अथक प्रयत्नांनंतर अखेर ७ जुलै ला काही नागरिकांना नाल्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह आमगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा पूल जुना असून त्याची उंची कमी आहे. तसेच दोन्ही बाजूंना कोणतेही संरक्षणात्मक रेलिंग नाही. पावसाळ्यात पाणी पुलावरून वाहते आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून त्याचे पुर्नबांधकाम करावे, दोन्ही बाजूंना मजबूत रेलिंग उभारावे, पावसाळ्यात धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत, पाणी वाढल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी. याशिवाय मृत रूपचंद बोपचे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *