दोन गुन्ह्यांत १८.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा व पानमसाल्याच्या अवैध वाहतुकी विरोधात सिहोरा व जवाहरनगर पोलिसांनी स्वतंत्र कारवाया करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे १८ लाख २५ हजार ६७३.७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत सिहोरा पोलिसांनी ११ जुलै रोजी रात्री १०.४५ ते ११.४५ वाजताच्या सुमारास मौजा सोंड्या ते टेमनी रोडवर मुखबिराच्या माहितीवरून सापळा रचला.

यावेळी महिंद्रा स्ट्राँग जितो मालवाहू वाहन (क्र. एमएच३६-एबी-५०३१) थांबवून तपासणी केली असता वाहनातून विविध कंपन्यांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू, गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी अजहर कलाम शेख (वय २९) व वसीम अखील शेख (वय ३२, दोघेही रा. सिहोरा, ता. तुमसर, जि. भंडारा) यांना ताब्यात घेतले. या कारवाईत विविध ब्रँडचा सुगंधी तंबाखू, गुटखा व पानमसाला, महिंद्रा जितो वाहन आणि विवो कंपनीचा मोबाईल असा ६ लाख ९७ हजार ९४३.७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हवालदार अनिल भैय्यालाल कळपते यांच्या फिर्यादीवरून सिहोरा पोलीस ठाण्यात अपराध क्र. ३०७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७५, १२३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटले करीत आहेत. दुसºया घटनेत जवाहरनगर पोलिसांनी १२ जुलै रोजी पहाटे १२.३० वाजता मौजा शाहापूर परिसरात कारवाई केली.

या वेळी महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. एमएच-२७-एटी-९०२९) वाहनातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान आशिष शंकर ठाकरे (वय २८) व मंगेश सदानंद धांडे (वय २५, दोघेही रा. तोंडली, ता. मौदा, जि. नागपूर) यांना अटक करण्यात आली. या कारवाईत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची पाकिटे, बारीक कापलेली सुपारी, चुना, पन्त्री तसेच स्कॉर्पिओ वाहन असा ११ लाख २७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी प्रदीप नीलकंठ चुटे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात अपराध क्र. ३३३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७५, १२३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा करीत आहेत. भंडारा जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठा, वाहतूक व विक्रीविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून अशा बेकायदेशीर व्यवसायावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *