भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील शीतला माता मंदिर ते बहिरंगेश्वर मंदिराजवळील चौक या प्रमुख आणि वर्दळीच्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जवळपास ५०० मिटरचा हा रस्ता पूर्णत: उखडून गेला असून खड्डे, गिट्टी आणि उडणाºया धुळीमुळे हा मार्ग अपघातप्रवण ठरला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याचे काम आजपर्यंत करण्यातच आले नाही, साधी रस्त्याची डागडूजी न केल्याने, येथील रस्त्यावर असलेल्या मोठमोठे खड्डे सुद्धा न बुजविल्याने वाहनचालकांसह पादचाºयांनाही हा ५०० मिटरच्या रस्त्यावर चालने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून सैल गिट्टीमुळे वाहनांचे संतुलन बिघडण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे किरकोळ अपघातांची मालिका सुरू असल्याची माहिती परीसरातील नागरिकांकडून मिळत आहे. विशेषत: दुचाकीस्वार आणि शाळकरी विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. धुळीचे लोट उडत असल्यामुळे श्वसनाच्या तक्रारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक दुकानदार आणि रहिवासी देखील या परिस्थितीमुळे त्रस्त झाले असून व्यवसायावरही परिणाम होत आहे. नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त नागरिकांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. भंडारा शहरातील इतक्या महत्त्वाच्या मार्गाची अशी अवस्था असणे ही अत्यंत चिंतेची बाब असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.