भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : मुंडीपार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेच्या कथित भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, असभ्य व अपमानास्पद वर्तन, ग्रामपंचायतीत नियमित अनुपस्थिती, नागरिकांची कामे प्रलंबित ठेवणे, विद्यार्थी व शेतकºयांना वेळेवर दाखले उपलब्ध करून न देणे तसेच विकासकामांमध्ये अनियमितता आणि भ्रष्ट प्रवृत्तीचे आरोप करत ग्रामसेविकेची सखोल चौकशी करून तातडीने स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी साकोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, ग्रामपंचायतीत कोणत्याही शासकीय कामासाठी गेल्यानंतर संबंधित ग्रामसेविका अनेकदा “मी दुसºया गावात बांधलेली आहे, तुमच्या कामासाठी नाही,” असे उत्तर देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रत्यक्षात ग्रामपंचायत कार्यालयात महिन्यातून अवघ्या तीन ते चार वेळाच उपस्थित राहत असल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांशी संबंधित कामे रखडत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच शेतकºयांना कृषीविषयक कागदपत्रे व विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे वेळेवर न मिळाल्याने त्यांनाही आर्थिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून, अनेक कामांमध्ये कथित अनियमितता व भोंगळ नियोजन असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ग्रामसेविकेच्या कथित असभ्य व अपमानास्पद वर्तनामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायत ही जनतेच्या सेवेसाठी असताना नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचा मुद्दाही निवेदनात ठळकपणे मांडण्यात आला आहे. मुंडीपार गावाच्या सर्वांगीण विकासाला यामुळे खीळ बसत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी तसेच ग्रामसेविकेचे तातडीने स्थानांतरण करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
गटविकास अधिकाºयांना निवेदन सादर करताना सौरभ वाल्मीक रामटेके, इमरान लतीफ शेख, विजय नवखरे, रतन रामभाऊ राऊत, विलास भरत ठवकर, मयूर घनश्याम लांडगे, शशिकांत भोवते, प्रवीण मुनेश्वर लांडगे, अल्लाउद्दीन कमुद्दीन शहा, गजानन सुरेश मते, योगेश रामचंद्र शिरसागर, संजीवकुमार अरविंद गेडाम, देवदास धननेराम लांडगे, धनंजय पाटील मेनपाले, सुमित नामदेव वाघाडे, पवन रामकृष्ण डहा- रे, गौरव गंगाधर शिरसागर, अनिस शकील शेख, संदेश रामचंद्र गौतम, सतीश वसंता शेंडे आणि रितिक धनपाल मेनपाले हे उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणामुळे मुंडीपार ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन याकडे किती गांभीयार्ने पाहते आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.