भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मानेगाव सडक येथील निर्माणाधीन अंडरपास परिसरात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अंडरपासच्या बांधकामामुळे मार्गावर चिखल आणि पाण्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने लहान-मोठी वाहने अक्षरश: अडकून पडत आहेत. परिणामी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था तासन्तास विस्कळीत होत असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
निर्माणाधीन पुलाच्या कामात आवश्यक नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सततच्या पावसातही वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना करण्यात न आल्याने वाहनचालकांसह मालवाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. चिखलयुक्त मार्गामुळे अनेक वाहने रस्त्यातच अडकून राहत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका अत्यावश्यक सेवांना बसत आहे. एसटी बस सेवा, रुग्णवाहिका, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शास कीय कर्मचारी, शेतकरी तसेच रोजंदारीवर काम करणारे नागरिक यांना वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे.
रुग्णवाहिका कोंडीत अडकल्याने रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत असून वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे. मानेगाव अंडरपासचे काम करणाºया कंपनीने तातडीने पयार्यी मागार्ची दुरुस्ती करून खडी, मुरूम टाकणे, पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनानेही संबंधित कंपनीला कठोर सूचना देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सु- रळीत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.