भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. याच अनुषंगाने गोंदिया येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया संघटनात्मक जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने संघटन मजबूत करण्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जबाबदाºयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची यंत्रणा अधिक गतिमान करण्यावर भर दिला. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकत्यार्ने आपापली जबाबदारी समर्पित भावनेने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि पूर्ण क्षमतेने पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
मतदारांशी प्रभावी संपर्क, संघटनात्मक समन्वय आणि निवडणूकपूर्व नियोजन यांना विशेष महत्त्व देण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला प्रदेश सरचिटणीस आमदार संजय कुटे, विभागीय सहसंयोजक आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, आमदार संजय भेंडे, माजी खासदार सुनील मेंढे, माजी आमदार सुधाकरकोहळे, विभागीय संयोजक दिनेश सूर्यवंशी, भाजपा गोंदिया जिल्हाध्यक्षा सिताताई रहांगडाले आणि सुधीर दिवे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमुळे भाजपच्या स्थानिक संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. बूथस्तरापासून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि जबाबदारीचे विभाजन यावर आगामी काळात भर राहण्याची शक्यता आहे. भक्कम संघटन, सक्षम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या समर्पित प्रयत्नांच्या बळावर नागपूर पदवीधर मतदारसंघात यश संपादन करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.