भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आठ दिवसापुर्वी भंडारा शहरातील विघ्नहर्ता हॉटेलसमोर भरदिवसा एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असतांनाच आज पुन्हा भरदिवसा एका अल्पवयीन मुलाच्या हत्येने भंडारा शहर हादरले. भंडारा शहरात घडणाºया गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांचा धाक राहिला की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: भंडारा पोलीसांना शरण गेला.घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांसह मोठया संख्येने नागरीकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला. आज १८ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भंडारा शहरातील मेंढा भागात (गौतम बुध्द वार्ड) एका सोळा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगा अंशु गजानन येरकडे याची गुप्तीने वार करून हत्या करण्यात आली.
भागीरथ भास्कर शाळेत वर्ग नवव्या वर्गात शिकणारा हा विद्यार्थी घरी जात असताना, ही घटना घडल्याचे समजते. घटनास्थळी मृत विद्यार्थ्यांचे दफ्तर पडले होते. मिळालेल्या माहितीनुसार अंशु आणि हत्या करणारा अल्पवयीन मुलगा हा मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये थोडा वाद झाला होता. आज दोघे भेटून चर्चा करीत असताना पुन्हा भांडण झाले. यावेळी मृतकाने आणलेल्या गुप्तीने तो वार करण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या हातातील गुप्ती हिसकावून घेत त्याच्यावर वार करून जीव घेतल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा भंडारा शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. घटनेनंतर मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मृतक अंशु येरकडे वातावरण काहीसे तापले होते. घटनेनंतर अनेकांनी शहरात ड्रग्स आणि अन्य मादक पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मागील काही दिवसात झालेल्या घटना यातूनच घडल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.