भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर तालुक्यातील मौजा गुडरी येथील सुरचंद कोठू पारधी हे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता बेपत्ता झाले. वनविभागाच्या वनकर्मचाºयांनी रात्रभर शोधमोहीम राबवून दुसºया दिवशी सकाळी त्यांचा सुखरूप शोध घेतला. विशेष म्हणजे, ज्या परिसरात त्यांचा शोध लागला, त्याच भागात वाघाचे लोकेशन असल्याची माहिती वनविभागाकडे होती. सुरचंद पारधी हे दि. २० आॅगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. राहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू करण्यात आली. दि. २० आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजेपासून तुमसर तसेच नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाºयांनी जंगल परिसरात रात्रगस्त सुरू करून सुरचंद पारधी यांचा शोध घेतला. अंधार, घनदाट जंगल आणि वन्यप्राण्यांचा वावर अशा आव्हानात्मक परिस्थितीत वनकर्मचाºयांनी परिसर पिंजून काढला. मात्र, रात्रीच्या शोधमोहीमेत त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर दि. २१ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपासून वनविभागाने पुन्हा व्यापक शोधमोहीम सुरू केली.
जंगल शिवारातील विविध भागांत शोध घेत असताना वनकर्मचाºयांना सुरचंद पारधी आढळून आले. त्यांची विचारपूस करून ओळख पटविल्यानंतर तेच बेपत्ता झालेले सुरचंद पारधी असल्याची खात्री करण्यात आली. वनकर्मचाºयांनी त्यांना वाहनातून पोलीस पाटील एस. एस. मेश्राम यांच्यासह सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविले. यावेळी गुडरीचे पोलीस पाटील एस. एस. मेश्राम, सरपंच तसेच तुमसर व नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी उपस्थित होते. वाघाच्या अधिवासात रात्र काढली सुरचंद पारधी यांनी रात्रभर जंगल परिसरातच वास्तव्य केले होते. विशेष म्हणजे, त्याच परिसरात वाघाचे लोकेशन असल्याची माहिती वनविभागाकडे होती. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले होते. सुदैवाने सुरचंद पारधी हे कोणत्याही दुखापतीशिवाय सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वनविभागाच्या कर्मचाºयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने रात्रगस्त व शोधमोहीम राबविल्यामुळे बेपत्ता गुराख्याचा सुरक्षित शोध घेण्यात यश आले. वनकर्मचाºयांच्या या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, जंगल परिसरात वाघ तसेच अन्य वन्यजीवांचा वावर असतो. त्यामुळे नागरिकांनी जंगलात प्रवेश करताना विशेष काळजी घ्यावी, एकट्याने जंगलात जाऊ नये आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वन्यजीवांच्या प्रत्येक हालचालीकडे केवळ भीतीच्या नजरेने न पाहता, मानव आणि वन्यजीव यांच्यात सुरक्षित सहअस्तित्व राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही वनविभागाकडून सांगण्यात आले.