टेकेपार पुनर्वसन गावाच्या मुख्य रस्त्यावरील पर्यायी मार्ग चिखलमय

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : टेकेपार पुनर्वसन गावात जाणाºया मुख्य रस्त्यावर गेट उभारण्याचे काम मागील १५ दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे गावात ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्याच्या बाजूने पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, हा पर्यायी रस्ता केवळ मुरूम टाकून तयार करण्यात आल्याने गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पावसामुळे पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला असून, या मार्गावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहने चालविताना वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच याच मार्गावरून ट्रॅक्टरची सतत वाहतूक होत असल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या टायरमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी चारचाकी वाहने या खड्डयांमध्ये फसण्याच्या घटना घडत असून, वाहनांच्या चेंबरसह इतर भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे.

पर्यायी रस्ता व्यवस्थित तयार न केल्याने गावातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाहनधारकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: पावसाच्या काळात रस्त्यावर चिखल आणि खड्डयांमुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी रस्त्याची तातडीने योग्य दुरुस्ती करून तो पर्यायी रस्ता ये-जा करण्यासाठी सुस्थितीत करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. मुख्य रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्ग हा नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने या मार्गावर आवश्यक मुरूम, गिट्टी अथवा खडी टाकून रस्ता मजबूत करावा आणि पावसामुळे निर्माण झालेला चिखल व खड्डे दूर करावेत, अशी मागणी टेकेपार पुनर्वसन येथील नागरिकांनी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *