भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या महापूराने रेसुवा जिल्ह्यात विध्वंस केला आहे. बुधवारी सकाळी रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण महापुरात हजारो नागरिक वाहून गेले असून नदीकाठची अनेक गावे व घरे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली आहेत. या महाप्रलयात आतापर्यंत ६२ जणांच्या मृत्युची नोंद झाली असून ५०० हून अधिक जण बेपत्ता आहेत. सध्या घटनास्थळी लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा महापूर स्थानिक मुसळधार पावसामुळे आलेला नसून तिबेटमध्ये हिमशिखर सरोवर फुटल्याने आला आहे. यामुळे भोटेकोशी आणि त्रिशुली नदीच्या पाण्याचा स्तर अचानक काही मिनिटांत प्रचंड वाढला. या महाप्रलयात १००० हून अधिक नागरिक वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्तरगया ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्षा चमेली गुरुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांती बाजार, परेबेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तर या नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा सर्वांत मोठा फटका बसला असून प्रचंड जनजीवन विस्कळीत झाले आहे.” पुराचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लष्कराचे प्रवक्ते राजाराम बस्नेत यांनी सांगितले की, “पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी लष्कराची हेलिकॉप्टर पाठवण्यात आली. मात्र, संपूर्ण परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यामुळे हेलिकॉप्टर खाली उतरू शकली नाहीत.” दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व वस्त्यांमधील नागरिकांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.