भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : संस्कार भारती शाखा, भंडारा तसेच श्रीबहिरंगेश्वर देवस्थान भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ३० आॅगस्ट रोजी श्रीकृष्ण गोपिका उत्सवाचे भव्य व भक्तिमय आयोजन करण्यात आले. श्रीकृष्णाच्या बाललीला, रासक्रीडा आणि गोपिकांच्या भक्तिभावाचे सुंदर दर्शन घडविणाºया या उत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या अध्यक्ष सौ. चंदाताई मुरकुटे यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. संस्कार भारती ध्येय गीता नंतर श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग, भक्तिगीते, नृत्य, रासलीला आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या कलाकारांनी सादर केलेल्या गोपिका नृत्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.’राधे-कृष्ण’च्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर कृष्णमय झाला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम या उत्सवातून अनुभवायला मिळाला. संस्कार भारतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार तसेच उपस्थित रसिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. श्रीकृष्णाच्या प्रेम, भक्ती आणि संस्कृतीचा संदेश देणारा हा उत्सव उपस्थितांच्या मनात अविस्मरणीय आठवणी निर्माण करून गेला. सहभागी सर्व श्रीकृष्णांना आणि गोपिकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.गोपाल काल्याच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.