८२ वर्षीय महिलेचा गळा आवळून हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया जिल्ह्याच्या सडक अजुर्नी तालुक्यातील ग्राम पळसगाव राका येथे ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कुसुम चैतराम कापगते (वय ८२) असे मृत महिलेचे नाव असून, रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिस- रात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, कुसुम कापगते या घरी एकट्या असल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला असावा. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर त्यांच्या दोन्ही हातांमध्ये असलेल्या सोन्याच्या बांगड्या अर्थात पाटल्या गायब असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय सोन्याची एकदानी, सोन्याची अंगठी तसेच घरातील अन्य सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमही चोरीला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घरातील आलमारी फोडण्यात आल्याचेही समोर आले असून, त्यामधील सोने, चांदी आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशातून वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली का, या दिशेनेही तपास होण्याची शक्यता आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा पळसगाव राका येथे दाखल झाला. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगलझोडे, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्यासह डुग्गीपार पोलीस व स्वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.

घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असून, फॉरेन्सिक टीम घटना स्थळी दाखल झाले आहे, आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास केला जात आहे. वृद्ध महिला घरी एकट्या असल्याची माहिती आरोपीला होती का, आरोपी परिचित होता की बाहेरील व्यक्ती, तसेच घरातील मौल्यवान वस्तूंची माहिती त्याला आधीपासून होती का, अशा विविध शक्यता तपासाच्या केंद्रस्थानी येऊ शकतात. दरम्यान, ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून आणि त्याचवेळी घरातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम गायब झाल्याच्या घटनेमुळे पळसगाव राका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरवस्तीत वृद्ध महिलेच्या घरात घुसून एवढी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत आणि सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे चोरीला गेलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची व रोख रकमेची नेमकी किंमत तसेच हत्येमागील निश्चित कारण अधिकृत पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *