कृष्ण मंदिर वार्डात गोपाळकाला व दहीहंडी उत्सव उत्साहात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील ऐतिहासिक श्री कृष्ण मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपाळकाला आणि दहीहंडी सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनासाठी आणि दहीहंडी पाहण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. गोकुळाष्टमी निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी श्रीकृष्णाची विशेष पूजा, अभिषेक आणि महाआरती संपन्न झाली. त्यानंतर दुपारी मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी सर्व भाविकांच्या उपस्थितीत ‘गोपाळकाला’ उत्सव साजरा करण्यात आला, ज्यामध्ये उपस्थितांना लाह्या, पोहे आणि दह्याचा प्रसाद (काला) वाटण्यात आला.

या सोहळ्यात प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. नरेश सूर्यभान पवनकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत, शहराचे प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट नितेश लाहोटी तसेच युको बँक भंडारा चे सेवानिवृत्त अधिकारी पुंडलिक लिमजे यांनी मिळून अत्यंत उत्साहात मानाची दहीहंडी फोडली. दहीहंडी फुटताच उपस्थित भाविकांनी विठ्ठल-रखुमाई आणि श्रीकृष्णाच्या जयघोषात एकच जल्लोष केला. याप्रसंगी प्रभागातील नगरसेवक हरिश्चंद्र मडावी तसेच निमेष डोकरीमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवाचे यशस्वी आयोजन श्रीकृष्ण देवस्थान पंच कमिटी भंडारा, कृष्ण मंदिर वार्ड आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केले होते. सर्व भाविकांसाठी गोपाळकाला प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडल्याबद्दल श्रीकृष्ण देवस्थान पंच कमिटी तर्फे सर्व उपस्थित भाविकांचे आणि सहकार्य करणाºयांचे आभार मानण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *