भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात भंडारा शहरातील ‘आदिशक्ती शीतला माता दहीहंडी क्रीडा मंडळा’च्या युवकांनी तब्बल १५ लाख रुपयांचा प्रथम क्रमांक पटकावत भंडाºयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. रायपूर शहरात प्रथमच सात थरांचा मानवी मनोरा उभारण्याचा पराक्रम करत युवकांनी उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. रायपूर येथील अवधपुरी मैदान, दहीहंडी उत्सव स्थळ, श्रीनगर रोड, गुडियारी येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात विविध भागांतून आलेल्या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. भंडाºयाच्या आदिशक्ती शीतला माता दहीहंडी क्रीडा मंडळाने आपल्या उत्कृष्ट नियोजन, एकजूट, शिस्त आणि धाडसी खेळाच्या जोरावर अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली.