भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, निराधार लाभार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोहाडीत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली चौंडेश्वरी माता मंदिरातून मोर्चाला सुरुवात होणार असून, मोर्चा मोहाडी तहसील कार्यालयावर धडकणार आहे.आयाजित धडक मोर्चामध्ये नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राकॉं.शरदपवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ.चरण वाघमारे यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेत केले.
धान उत्पादक शेतकºयांना जाहीर केलेला बोनस तात्काळ देण्यात यावा. सन २०१७ व २०१९ च्या कर्जमाफीमध्ये पात्र असूनही वंचित राहिलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळावा,कर्जबाजारीपणामुळे मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या वारसांना कर्जमाफी देऊन ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्र देण्यात यावे, नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात यावी, उन्हाळी धानासाठी शासकीय खरेदी केंद्रे वेळेत सुरू करून योग्य दर मिळवून द्यावा, खत, बियाणे, कीटकनाशके व इतर शेती निविष्ठांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस धोरण करावे ,सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करावीत, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ पेन्शन व इतर योजनांची प्रलंबित रक्कम तात्काळ द्यावी, वयोवृद्ध, निराधार व गरजू नागरिकांना गॅस, रेशन, पेन्शन व इतर योजनांचा लाभ अनावश्यक कागदपत्रांशिवाय द्यावा, मोहाडी नगर पंचायतीची विद्यमान कर आकारणी रद्द करून नियमानुसार नव्याने व परवडणारी कर आकारणी करावी, ऊस उत्पादक शेतकºयांना दरवाढ देण्यात यावी, वनक्षेत्रालगतच्या शेतकरी, शेतमजूर व नागरिकांचे वनहक्क, वनजमीन व प्रलंबित दावे तातडीने निकाली काढावेत; वन्यप्राण्यांच्या नुकसानीची भरपाई वेळेत द्यावी, मनरेगा अंतर्गत प्रलंबित मजुरी व पूर्ण झालेल्या कामांची देयके तात्काळ अदा करावीत, दिव्यांग व्यक्तींना अनुदान, पेन्शन, रेशन, एसटी सवलत व इतर शासकीय योजनांचा लाभ तातडीने द्यावा, महिलांना ठउटउ कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवास सवलत सुरळीत मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र पण वंचित महिलांना तातडीने लाभ द्यावा. शासकीय शाळांमध्ये वर्गखोल्या,
इमारत, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आयकर विवरणपत्र किंवा तांत्रिक कारणांमुळे पात्र शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नये; पात्र पंचायती समिती सदस्यांनाही नियमानुसार लाभ द्यावा, झाडीपट्टीतील पात्र कलाकारांना नियमित मानधन देण्याची व्यवस्था करावी, स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीला आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी व विद्यार्थ्यांना योग्य दिलासा द्यावा, सन २०२१ पूर्वीपासून अतिक्रमित जागेवर वास्तव्यास असलेल्या पात्र भूमिहीन व बेघर कुटुंबांना नियमानुसार जमिनीचे पट्टे द्यावेत, महाडीबीटी तसेच विविध शासकीय योजनांचे प्रलंबित अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे, विविध योजनांमध्ये काम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रलंबित पुढील हप्ता वेळेत देण्यात यावा, वयोवृद्ध नागरिकांना कागदपत्रांच्या अडचणीमुळे शासकीय योजनांपासून वंचित ठेवू नये; उपलब्ध अधिकृत पुराव्यांच्या आधारे पात्रता निश्चित करून लाभ द्यावा व गोड्या पाण्यातील मासेमारी करणारे ढिवर समाजबांधवांचे समस्या सोडवीविण्यात याव्या इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असुन या मोर्चामध्ये नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी आ.वाघमारे यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला चरण वाघमारे यांच्यासह चंद्रशेखर भिवगडे,अजय मेश्राम, गितेश ठोंबरे, नितेश मारवाडे आदि उपस्थित होते.