भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गुदमा-प्रतापबाग रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यावरून गोंदिया तालुक्यातील शेतकºयांचा संताप उफाळून आला आहे. जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी १२ गावांतील शेतकºयांनी आज गोंदिया-बालाघाट मार्गावरील कटंगी येथे रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे, शेतकºयांनी भजन गात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. गुदमा-प्रतापबाग रेल्वे मार्गासाठी कटंगी कला, नागरा, हलबीटोला, सावरी, गर्रा, गोंदिया खुर्द, पोवारीटोला, दतोरा, खमारी, चुलोद यांच्यासह एकूण १२ गावांतील शेतकºयांची जमीन, घर, प्लॉट आणि दुकाने अधिग्रहित केली जात आहेत. मात्र, या जमिनीच्या बदल्यात मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. याच मागणीसाठी शेतकरी कटंगी चौकात एकत्र आले. भजन गात, हातात फलक घेत शेतकºयांनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकºयांनी घेतली.