भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : माजी खासदार सुनील मेंढे यांनी आज भंडारा जिल्हाधिकारी सावनकुमार यांची भेट घेत जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींशी निगडित विविध विषय यावेळी बैठकीत मांडण्यात आले. तुमसर येथील रॅक पॉईंटचे काम पूर्ण झाले असून, तेथे रॅक बुकिंगची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी सुनील मेंढे यांनी केली.
सध्या फर्टिलायझर रॅक नागपूर व गोंदिया येथे उतरविले जात असल्याने स्थानिक व्यापारी व कंपन्यांना अतिरिक्त वाहतूक खचार्चा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने रेल्वे विभाग आणि व्यापारी वगार्ची संयुक्त बैठक आयोजित करून रॅक पॉईंटबाबत व्यापारी व कंपन्यांना योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. वरठी (भंडारा रोड) येथील नागरिकांच्या सोयीसाठी मंजूर करण्यात आलेल्या फुट ओव्हर ब्रिजच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. तत्कालीन खासदार म्हणून सुनील मेंढे यांनी २०२२ मध्ये या पुलासाठी तब्बल ८.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.
सध्या पुलाचे काम सुरू असून, स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर काम करताना कोणत्याही नागरिकाची खासगी जागा बाधित होणार नाही, त्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. तसेच या पुलावरून आॅटो, मोटारसायकल व सायकल यांची वाहतूक करता येईल. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती उपलब्ध असतानाही गरीब घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी महागड्या दराने रेती खरेदी करावी लागत आहे, याबाबतही मेंढे यांनी चिंता व्यक्त केली. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घर उभारण्यासाठी रेती सुलभ आणि माफक दरात उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. याशिवाय मुजबी ते आरटीओ कार्यालयादरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामालाही गती देऊन कामाची प्रगती आणि नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा आढावा घेत संबंधित यंत्रणांनी काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वैनगंगा नदीवरील पुलावरील माती व वाढलेली झाडे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा मुद्दाही त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. पुलाची तातडीने स्वच्छता करून रस्त्यावर आलेली झाडे हटवावीत आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या सर्व विषयांची जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, माजी खासदार सुनील मेंढे यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीस झेडआरसीसीयूचे सदस्य सेवक कारेमोरे, भाजप जि.प.गटनेते विनोद बांते, दीपक लांजेवार उपस्थित होते.