पूर्वसूचना न देता रेलवे गेट बंद ठेवले जात असल्याने नागरिक त्रस्त ■ जनआक्रोश मोर्चाच्या धास्तीने रस्त्याची तात्पुरती डागडुजी
भंडारा पत्रिका / प्रतिनिधि
तिरोडा : तिरोडा शहरातून कवलेवाड्याकडे जाणाऱ्या मार्गाची मागील जवळपास चार वर्षांपासून दुरुवस्था झाली आहे. रेलवे उड्डाणपूलाच्या रखडलेल्या बांधकामामुळे या मार्गाचे पक्के बांधकाम रखडले असून, रस्त्यावर ठीकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यानाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींची दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तिरोडा-कवलेवाडा मार्ग हा तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून तिरोडा, चांदपूर, सिहोरा आदी भागाकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची वेजा असते. याशिवाय उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, वीज वितरण कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय आदी महत्त्वाच्या शासकीय कार्यालये याच परिसरात असल्याने दररोज शेतकरी, कामगार, विद्यार्थी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींची मोठ्या प्रमाणात वेजा सुरू असते. मात्र, रेलवे उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व रेलवे विभागाच्या अखत्यारीतील जवळपास एक किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
रस्त्यावर लहान-मोठे असंख्य खड्डे पडल्याने दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे.
मोर्च्याच्या धास्तीने तात्पुरती डागडुजी?
दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृखाली तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा घडकणार असल्याने संबंधित विभागांची धावपळ सुरू झाल्याचे चित्र दिसून आले. मोर्चामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित होऊन आपली कोंडी होऊ नये, या दस्तीने सार्वजनिक बांधकाम व रेलवे विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
रस्त्यावर प्रथम जाड गिट्टी टाकण्यात आली आणि त्यावर बारीक गिट्टीची चुरी पसरवून खड्डे बुजविण्यात आले. मात्र, ही डागडुजी कायमस्वरूपी उपाय नसून केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याचे नागरिकांची भावना आहे. चार वर्षांपासून रस्त्याची दुरुवस्था कायम असताना मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर अचानक दुरुस्ती करण्यात आल्याने नागरिकांंनी संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता रेलवे उड्डाणपूलाचे काम आणि संबंधित रस्त्याचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच रेलवे गेट बंद ठेवताना नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
चार वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पूर्वसूचना न देता रेलवे गेट बंद
या मार्गावरील रेलवे गेटही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रेलवे गेट बंद ठेवले जात असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रस्ता आधीच खड्डेमय असताना रेलवे गेट बंद असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे वेळ, ईधन आणि श्रमाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याच्ये नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून बंद असलेले रेलवे गेट कोणतीही पूर्वसूचना न देता उघडण्यात आले. त्यामुळे संबंधित विभाग नागरिकांच्या नियमित अडचणींकडे दुर्लक्ष करून केवळ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हालचाल करीत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.