भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बगा आदिवासी समाजात काही दिवसांपूर्वी विविध आजारांची साथ पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. बालाघाट जिल्ह्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या मधु, कंगेवाही, सुंदरवाही, बैगाटोला, बोंदारी, धर्मशाला, मोहनपूरी, उपाचक्र, कुलपा, माटे, पालागोंदी, बिटोली, अडोरी, कोरका, कोंडेकसा, देवरबेडी, मच्छरदा, पाथरी, पाथरी टोला, भवानीटोला, महेंद्री, इतखेड़ा, बाम्हिणी व कामका या गावात मागील तीन महिन्यापासून बैगा बालकांनी गोवर (खसरा) मलेरिया या आजाराची लागण झाली आहे. मलेरिया, डायरिया, टायफाईड तसेच त्वचेसंबंधी आजारांचा नागरिकांना त्रास होत होता. या आजारांमुळे ४० लहान मुले दगावली असल्याची माहिती समोर आल्यानंतर
परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या परिस्थितीची दखल घेत गोंदियातील सयोग ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत बालाघाट जिल्ह्यातील संबंधित गावात मेडिकल कॅम्प सुरू केला. या कॅम्पच्या माध्यमातून गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. मेडिकल कॅम्पमध्ये तपासणीदरम्यान आजारी आढळल्यास मुलांना पुढील उपचाराची गरज
असलेल्या लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात आली. तपासणीत ३२ मुलांना पुढील उपचाराची आवश्यकता असल्याचे आढळून आले. त्यानंतर सयोग ग्रुपच्या माध्यमातून या मुलांना गोंदिया येथे आणण्यात आले. गोंदियातील सयोग रुग्णालयात या ३२ मुलांवर मोफत उपचार करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर मुलांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावात सुखरूप पोहोचवण्यात आले. त्यामुळे संबंधित मुलांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला
आहे. बालाघाटमधील आदिवासी समाजात निर्माण झालेल्या आरोग्याच्या परिस्थितीत सयोग ग्रुपने पुढाकार घेत केवळ तपासणीच केली नाही, तर उपचाराची गरज असलेल्या मुलांना गोंदियात आणून मोफत उपचाराची सुविधाही उपलब्ध करून दिली. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे अडचणीचे ठरणाऱ्या कुटुंबांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे. मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करून आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक नागरिकांची तपासणी आणि ३२ मुलांवर मोफत उपचार करून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले आहेत. या उपक्रमानून सयोग ग्रुपने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले आहे.