भंडाऱ्यात दोन बालकांचे दत्तक विधान पूर्ण

जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते पालकांना आदेश सुपूर्द

दत्तक प्रक्रियेला गति; पुणे आणि गुजरात येथील पालकांना मिळाला दिलासा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कौटुंबिक वातावरण मिळावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान प्रक्रियेअंतर्गत भंडारा जिल्ह्यात दोन बालकांचे दत्तक विधान २२ ऑक्टोबर २०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते पुणे आणि गुजरात येथील दत्तक इच्छुक पालकांना दत्तक आदेश सुपूर्द करण्यात आले.

केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या (CARA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही प्रक्रिया पार पडली. पूर्वी दत्तक विधानासाठी न्यायालयात अर्ज सादर करून प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. मात्र, केंद्रीय दत्तक संसाधन नियम २०२२ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या ४ मे २०२६ रोजीच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना दत्तक आदेश देण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे दत्तक विधान प्रक्रियेला गती मिळून वेळेची बचत होत आहे.

दत्तक आदेश सुपूर्द केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पालकांनी प्रशासनाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. बालकांना हक्काचे कुटुंब मिळवून देण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरत आहे.

ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे, संरक्षण अधिकारी शिल्पा वंजारी, माहिती विश्लेषक निलय बेंदवार, बाल उदय दत्तक संस्थेच्या अधीक्षक राणू समरीत आणि सामाजिक कार्यकर्त्या दिव्या दिघोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कायदेशीर प्रक्रियेतूनच दत्तक घ्या बालकांना दत्तक घेताना नागरिकांनी नेहमी कायदेशीर प्रक्रियेचाच अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी केले. बालकांचे संरक्षण, पुनर्वसन आणि त्यांना सुरक्षित कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दत्तक विधान प्रक्रिया महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *