भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : शासनाची रॉयल्टी भरून अधिकृत पद्धतीने ट्रकद्वारे भंडारा शहरात आणण्यात येणारी रेती ग्राहकांच्या बांधकामस्थळी ट्रॅक्टर किंवा पिकअप वाहनाद्वारे घरपोच करण्यासाठी स्वतंत्र व व्यवहार्य नियम निश्चित करावेत, अशी मागणी भंडारा शहरातील बांधकाम साहित्य विक्रेते व रेती विक्रेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भंडारा शहराजवळ गोसेखुर्द धरणामुळे बहुतांश काळ नदीपात्रात पाणी उपलब्ध राहत असल्याने शहरालगत रेती उपलब्ध होत नाही. परिणामी बांधकामासाठी लागणारी रेती शहरापासून सुमारे ३० किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावरून आणावी लागते. एवढ्या लांब अंतरावरून प्रत्येक ग्राहकाच्या घरापर्यंत केवळ ट्रॅक्टरद्वारे रेती पोहोचविणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्याने विक्रेते रॉयल्टी भरून ट्रकद्वारे रेती शहरात आणतात व त्यानंतर गरजेनुसार ट्रॅक्टर किंवा पिकअपमधून ग्राहकांना घरपोच करतात. मात्र, शहरात ट्रकद्वारे आणलेली अधिकृत रेती अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचविताना वाहन अडविणे, दंडात्मक कारवाई करणे तसेच काही प्रकरणांत गुन्हे दाखल होण्याच्या प्रकारांमुळे विक्रेते, वाहनचालक व ग्राहकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्वतंत्र पास किंवा परवाना द्या!
अधिकृत रॉयल्टीची रेती असल्याचे आवश्यक कागदपत्रंद्वारे सिद्ध होत असल्यास केवळ अंतिम घरपोच वितरणासाठी वाहन बदलल्यामुळे कारवाई होऊ नये, यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. शहराच्या हद्दीत रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअप वाहनांसाठी स्वतंत्र पास किंवा परवाना व्यवस्था करावी, तसेच रॉयल्टी, वाहनाची क्षमता, अंतर आणि घरपोच वितरणाबाबत एकसमान नियम निश्चित करावेत, अशीही मागणी आहे.
या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, पोलीस विभाग व बांधकाम साहित्य विक्रेत्यांची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा. शासनाचा महसूल बुडविणे किंवा अनधिकृत रेती वाहतूक करणे हा उद्देश नसून अधिकृत रॉयल्टी भरलेल्या रेतीची ग्राहकांना कायदेशीर व सुलभ पद्धतीने वाहतूक करता यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी अतुल लोणारे, रूपचंद शेंडे, रोशन व्यवहारे, कृष्णा मुटकुुरे, संतोष भुजाडे, मुरली सार्वे, राजु तिडके, लखन लोणारे, अखिल सेलokar आदि उपस्थित होते.