भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासनाच्या विविध योजना असल्या, तरी त्याचा लाभ अनेक वंचित घटकांपर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील गारुडी समाजातील नागरिकांनी आपल्या समस्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी आर्त हाक दिली आहे. आजही या समाजातील नागरिकांना ‘गारुडी’ किंवा ‘मागास समाज’ म्हणून नव्हे, तर ‘पेंढारी’ म्हणून संबोधले जाते. त्यामुळे सामाजिक गैरसमज दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली आहे. गारुडी समाजातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आजही कचरा आणि भंगार गोळा करण्यावर अवलंबून आहे. सकाळ होताच अनेक महिला आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन कचरा आणि भंगार गोळा करण्यासाठी बाहेर पडतात. तर काही महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भीक मागण्याची वेळ येत असल्याचे सांगतात.
रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने आणि पुरेसे कौशल्यप्रशिक्षण मिळत नसल्याने ही कुटुंबे आर्थिक अडचणींच्या दुष्टचक्रात अडकली आहेत. गारुडी समाजातील पालकांनाही आपल्या मुलांनी इतर समाजातील मुलांप्रमाणे चांगले शिक्षण घ्यावे, मोठ्या शाळांमध्ये शिकावे आणि आयुष्यात पुढे जावे, अशी इच्छा आहे. मात्र, शाळेत किंवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर आपल्या मुलांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते, अशी खंत पालकांनी व्यक्त केली आहे. आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक वातावरणामुळे अनेक मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याशिवाय आवश्यककागदपत्रांचा अभाव ही या समाजासमोरील मोठी समस्या आहे. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय कागदपत्रे मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कागदपत्रे नसल्यामुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेणेही कठीण होत असल्याची परिस्थिती आहे.