भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा येथे ‘जेल भरो’ आंदोलन केले. शासनाने गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या भंडारा जिल्हा शाखेने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना जिल्हा आरोग्य अधिकाºयांमार्फत निवेदन देण्यात आले. आशा व गटप्रवर्तक हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा असून माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, आरोग्य जनजागृती, सर्वेक्षणे तसेच आपत्कालीन आरोग्य सेवांमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
कोविड काळातही त्यांनी जोखमीच्या परिस्थितीत सेवा बजावली. मात्र, त्यांच्या कामाच्या तुलनेत मिळणारा मोबदला अत्यल्प असून केंद्र सरकारकडून २०१८ पासून प्रलंबित असलेली मोबदला वाढ तातडीने लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आशा व गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचेवय ६५ वर्षे करावे, पेन्शन योजना लागू करावी, किमान वेतनाचा कायदेशीर लाभ द्यावा, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, ग्रॅच्युइटी व पीएफसह सामाजिक सुरक्षा द्यावी, अशी मागणी आहे. दर महिन्याच्या १० तारखेपूर्वी नियमित मोबदला द्यावा, थकीत देयके तातडीने अदा करावीत, सेवानिवृत्त कर्मचाºयांचे लाभ विनाविलंब द्यावेत तसेच वाढीव व अतिरिक्त कामासाठी स्वतंत्र मोबदला द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटक नेते माधवराव बांते, जिल्हा उपाध्यक्ष भूमिका बंजारी, कार्याध्यक्ष आशिषा मेश्राम, जिल्हा सचिव सुनंदा दहिवले, जिल्हा संघटक राजू बडोले, जिल्हा उपाध्यक्ष साधना बडोले, लोभा सोनवाने, सुनिता बुरे, सविता नारनवरे, शैलेन्द्र गणवीर, लता जुमळे, वनिता पचबुद्धे, नंदा चवळे, श्यामकला कांबळे, वनश्री चव्हाण, गीता शेंडे यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.