भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : विद्यार्थी विज्ञान मंथन (श्श्ट) इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्हा टॉपर ठरलेली तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी अलीना हिने गोंदिया येथील स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित व्हीव्हीएम सन्मान सोहळ्यात आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली. शैक्षणिक गुणवत्ते सोबतच उत्कृष्ट वक्तृत्वकलेचे दर्शन घडवत अलीनाने उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली. मुख्य शिक्षण अधिकारी (सीईओ), व्हीएनआयटी (श्ठकळ) नागपूरचे विभागप्रमुख (एचओडी) तसेच व्हीव्हीएम नागपूरचे प्रमुख अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सन्मान सोहळा पार पडला. जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अलीनाचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अलीनाने ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर इंग्रजीतून प्रभावी मनोगत व्यक्त केले. तिची ओघवती भाषा, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि विषयाची सखोल मांडणी यामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेले.
भाषणानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून तिला ‘स्टँडिंग ओव्हेशन’ देत गौरविले. कार्यक्रमातील विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतात अलीनाच्या उल्लेखनीय यशाचा गौरव केला. विज्ञान विषयातील तिची आवड, नेतृत्वगुण, अभ्यासातील सातत्य आणि आत्मविश्वास यांचे विशेष कौतुक करण्यात आले. भविष्यात ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच उल्लेखनीय यश संपादन करेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. स्टार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या पिल्लई मॅडम यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर अलीनाने मांडलेले विचार अत्यंत परिपक्व आणि प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच तिच्या नेतृत्वगुणांचे, शैक्षणिक गुणवत्तेचे आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थी विज्ञान मंथनमध्ये जिल्हा टॉपर ठरल्यानंतर व्हीव्हीएम सन्मान सोहळ्यातही आपल्या बुद्धिमत्ता, वक्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अलीनाने तिरोडा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळा, पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.