भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : पहाटेच्या काकडआ- रतीपासून सुरू झालेला प्रवास… घरची हलाखीची परिस्थिती… उदरनिर्वाहासाठी वृत्तपत्र वाटपापासून कापड दुकानात केलेली मेहनत… विद्यार्थ्यांना घडविताना स्वत:च्या स्वप्नासाठी सार्वजनिक वाचनालयात केलेला अभ्यास… आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार आणि बदनामीचे प्रयत्न या सर्वांवर मात करत जिद्द, मेहनत, सेवाभाव आणि शिक्षणाच्या जोरावर नितीन अशोक पारधी यांनी आपल्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेतून त्यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांच्या या यशाने लाखांदुरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
लाखांदुर येथील गांधी चौकातील रहिवासी असलेले नितीन पारधी हे अशोक बळीराम पारधी व मिनाक्षीअशोक पारधी यांचे सुपुत्र. अल्पभूधारक शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह असतानाही आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या बळावर नितीन यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. १४ मे १९९८ रोजी जन्मलेल्या नितीन यांनी प्राथमिक शिक्षण शिवाजी प्राथमिक विद्यालय, लाखांदुर येथे, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय, लाखांदुर येथे पूर्ण केले. त्यानंतर सिद्धार्थ ज्युनिअर कॉलेज, लाखांदुर येथून बारावी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून पदवी आणि स्व. ज्ञानेश्वरजी मेंघरे अध्यापक महाविद्यालय, कोंढा/कोसरा येथून बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले.
पोटासाठी काम अन् भविष्यासाठी अभ्यास..!
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही नितीन यांनी कष्टाची कास सोडली नाही. शिक्षणासोबत त्यांनी सलग पाच वर्षे वृत्तपत्र वाटपाचे काम केले. त्याच काळात लाखांदुर येथील मुकेशएन.एक्स. या कापड दुकानातही त्यांनी काम केले. परिस्थितीशी संघर्ष करत असतानाच शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषद हायस्कूल, लाखांदुर येथे त्यांनी नवोदय, शिष्यवृत्ती व एन.एम.एम.एस. परीक्षांचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या बुद्धिचातुयार्ची, विषयावरील पकड आणि अध्यापन कौशल्याची दखल घेत विद्यालयाने इयत्ता सहावी ते आठवीच्या गणित विषयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थी यशस्वी झाले, तर अनेक विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला. त्यामुळे नितीन हे केवळ स्वत:चे भविष्य घडविणारे नव्हे, तर इतरांच्या भविष्याला आकार देणारे शिक्षक म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
टीकेला उत्तर दिले ते यशाने…!
जीवनात संघर्ष असतोच; मात्र नितीन यांच्या वाट्याला संघर्षासोबतकाही कटू अनुभवही आले. त्यांच्या सेवाभावी वृत्ती व कलाकौशल्यामुळे काहींनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ न देता ‘आपले ध्येय मोठे आहे’ या जिद्दीने वाटचाल सुरू ठेवली. शाळेतील काम आटोपल्यानंतर घरी परतल्यावरही त्यांचा दिवस संपत नसे. नगरपंचायत लाखांदुरच्या सार्वजनिक वाचनालयातील अभ्यासिकेत बसून त्यांनी आपल्या भावी आयुष्याची तयारी सुरू ठेवली. दिवसभर विद्यार्थ्यांना शिकविणे आणि त्यानंतर स्वत:च्या स्वप्नासाठी अभ्यास करणे, हा त्यांचा नित्यक्रम बनला. अखेर त्यांच्या या अथक परिश्रमाला यश आले. महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेतून रत्नागिरी जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.