भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत कारधा केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत कु. आरोही अनमोल रामटेके हिने आपल्या गुणवत्तेची चमक दाखवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावकºयांच्या वतीने तिचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. अभ्यासातील सातत्य, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आरोहीने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली. कारधा केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवणे ही तिच्या शैक्षणिक गुणवत्तेची पावती असून, तिच्या यशामुळे पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्कार सोहळ्यात आरोहीच्या यशाचे कौतुक करताना उपस्थितांनी तिच्या मेहनतीचे विशेष अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे, हे आरोहीच्या यशातून अधोरेखित झाले आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर विद्यार्थी कोणतेही शैक्षणिक ध्येय गाठू शकतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘गावातील मुलीने मिळवलेले हे यश म्हणजे संपूर्ण गावाच्या अभिमानाची गोष्ट आहे,’ अशी भावना सत्कार समारंभाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रुपेश कोठीरामजी खवास यांनी व्यक्त केली. आरोहीचे हे यश परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार असून, तिच्या यशामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना नवी उमेद मिळाली असल्याचे रुपेश खवास यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आरोहीच्या या उज्ज्वल यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही तिने अशीच उत्तुंग यशाची शिखरे सर करावीत, देशसमाजाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी तिला गावकºयांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.