भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गणेशपूर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. प्रथमच तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची निवड बॅलेट पेपरद्वारे घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण १६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत भावेश नागपुरे यांना ८८ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी चंद्रशेखर पालांदुरकर यांना ७७ मते प्राप्त झाली. दोन मते ‘नोटा’ला पडली. त्यामुळे भावेश नागपुरे यांनी ११ मतांनी विजय मिळवत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
गणेशपूर गावाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभाग घेतला. या सहभागामुळे गावातील लोकशाही प्रक्रियेबद्दलचा विश्वास आणि जागरूकता अधोरेखित झाली. भावेश नागपुरे यांच्या विजयाबद्दल पवन मस्के, गौरीशंकर नागपुरे, प्रवीण मेहर, अमित नवखरे, गजानन मेहर, विजय मेहर, विकी दयाल, अशोक खोब्रागडे, संतोष थोटे यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. गणेशपूरच्या विकासासोबतच गावात शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य कायम राखण्यासाठी तंटामुक्ती समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.