गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरातील चांदणी चौक परिसरात यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. चांदणी चौकातील नागरिक व तरुण युवावर्गाच्या पुढाकारातून सागर तलावात कानोब्याचे विसर्जन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. या निमित्ताने परिसरात आकर्षक सजावट, रोषणाई, प्रसाद वाटप तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही चांदणी चौकातील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत चांदणी चौक ते सागर तलाव परिसराची रात्रभर जागून स्वच्छता केली. विसर्जनासाठी येणाºया भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये, तसेच गर्दीमध्ये सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी रस्त्यावर योग्य पद्धतीने बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली होती. येणाºया भाविकांसाठी एक बाजू आणि जाणाºया भाविकांसाठी दुसरी बाजू ठेवण्यात आल्याने वाहतूक व गदीर्चे नियोजन व्यवस्थित झाले. आकर्षक सजावट व रोषणाईने परिसर उजळला श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चांदणी चौक परिसरात आकर्षक तोरणे, रंगीबेरंगी लाइटिंग करण्यात आली होती.
सजावटीमध्ये हनुमंताची मूर्ती तसेच प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली होती. सागर तलाव परिसरात रंगीबेरंगी फुगे लावण्यात आल्याने संपूर्ण परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. आकर्षक विद्युत रोषणाई आणि संगीतमय वातावरणामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था कार्यक्रमाला येणाºया भाविकांसाठी बुंदीचा प्रसाद व केळीचे वाटप करण्यात आले. तरुणांच्या या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रात्री उशिरापर्यंत भाविकांची व नागरिकांची मोठी गर्दी परिसरात पाहायला मिळाली. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या आयोजनामध्ये चांदणी चौकातील समस्त तरुण युवावर्गाने एकजुटीने सहभाग घेतला. स्वच्छता, सजावट, रोषणाई, भाविकांची येजा, प्रसाद वाटप आणि विसर्जन व्यवस्था अशा विविध जबाबदाºया युवकांनी उत्स्फूर्तपणे पार पाडल्या. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. या आयोजनासाठी नगरपरिषद कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयामुळे विसर्जनाचा कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडला. चांदणी चौकातील युवकांनी उत्सव साजरा करण्यासोबतच स्वच्छता, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा आदर्श निर्माण केला, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.