चिखलीत काठीने डोक्यात वार करून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील चिखली परिसरातील मिरचीटोली येथे नातेवाईकांमध्ये झालेल्या वादातून एका ६० वर्षीय व्यक्तीची काठीने डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाची ओळख रामसिंग दुरगसिंग उईके (वय अंदाजे ६०, रा. मिरचीटोली, चिखली) अशी झाली आहे. तर या प्रकरणातील आरोपी नितेश शिवचरण भलावे (वय अंदाजे २८, रा. कुडवा, ता. तिरोडी, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गोबरवाही पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व मृतक हे नातेवाईक असून एकाच घरात राहत होते. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.३० ते ६.४५ वाजताच्या दरम्यान मिरचीटोली, चिखली येथे दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी नितेश भलावे याने घराबाहेर असलेल्या बैलबंडीच्या उबारीतील काठीने रामसिंग उईके यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी घटना स्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे. याप्रकरणी चिखली येथील पोलीस पाटील योगेश चमरू पेंदाम (वय ४०) यांच्या तोंडी रिपोर्टवरून गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अजय पं. रोडे यांनी केली. घटनेमागील नेमके कारण, आरोपीचा शोध आणि हत्येच्या संपूर्ण परिस्थितीचा पोलीस तपास करीत आहेत मृतक आरोपी

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *