भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीवर जॅकी (जयकुमार) रावलानी यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने ६ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यातील विविध विकासकामांचे नियोजन, प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि विकास आराखड्याला दिशा देणारी महत्त्वाची समिती मानली जाते. अशा समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून जॅकी (जयकुमार) रावलानी यांची निवड झाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची आणि विकासाभिमुख योगदानाची दखल शासनाने घेतल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
भंडारा शहरातील खात रोड परिसरातील रहिवासी असलेले जॅकी (जयकुमार) रावलानी हे विविध सामाजिक, सार्वजनिक आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या विकास नियोजनात स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील आणि विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समितीवर दोन नामनिर्देशित सदस्यांसह नऊ विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये जॅकी (जयकुमार) रावलानी यांचाही समावेश आहे. शासनाच्या नियमानुसार त्यांचा कार्यकाळ नामनिर्देशन रद्द होईपर्यंत किंवा विद्यमान मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपेपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत राहणार आहे.
या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून जॅकी (जयकुमार) रावलानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.