भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
तुमसर : येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी गरोदर मातांच्या वार्डात पुरवण्यात आलेल्या अन्नामध्ये (वरण आणि भात) अळ्या निघाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरोदर महिलांना रविवारी नेहमीप्रमाणे आहार पुरवण्यात आला. मात्र, जेवण करत असताना वरण आणि भातात अळ्या असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी तातडीने हा दूषित आहार रुग्णालयाच्या मुख्य कार्यालयात नेऊन उपस्थित डॉक्टरांना दाखवला. डॉक्टर आयुषी कुंजेकर यांनी तो आहार आपल्या ताब्यात घेतला असला, तरी रुग्णालयातील निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत रुग्ण प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या रुग्णालयात अन्न पुरवठ्याचे कॉन्ट्रॅट मे. राजर्षी शाहू नगरी सेवा सहकारी संस्था, लिमिटेड पालघर (ठाणे) यांच्याकडे आहे. कॉन्ट्रॅदाराच्या या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजबिये यांच्याकडे थेट तक्रार करण्यात आली आहे.
सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरोदर मातांना अशा प्रकारे अस्वच्छ आणि किडलेले अन्न पुरवले जात असल्याने रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदारार खरोखरच कठोर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे पांघरूण घातले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.