मोरेश्वर बिसने / भंडारा पत्रिका तुमसर : राष्ट्रीय महामार्गावरील देवाडी येथील उड्डाणपूल तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने अखेर दखल घेतली आहे. उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, खड्डे बुजविल्यानंतर उड्डाणपुलावर डांबरीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे.
देवाडी उड्डाणपुलावर मागील अनेक महिन्यांपासून मोठेमोठे खड्डे पडले होते. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
या गंभीर समस्येबाबत छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू केली.
नागरिकांनी केली तात्पुरती डागडुजी
प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे अखेर स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेतला. स्टेशन टोलीचे माजी उपसरपंच श्याम नागपुरे, देवाडीचे ग्रामपंचायत सदस्य शेखर दमाहे आणि सोनू बिरनवारे यांनी सिमेंट, गिट्टी व रेतीचे मिश्रण तयार करून खड्ड्यांमध्ये टाकले. जेसीबीच्या साहाय्याने ही तात्पुरती डागडुजी करण्यात आली. त्यानंतर संबंधित विभागाकडून उड्डाणपुलावरील खड्ड्यांवर डांबरीकरण सुरू करण्यात आले.
सर्व्हिस रोडचे काय?
उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू झाली असली, तरी देवाडीहून थेट रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडची अवस्था अद्याप बिकट आहे. या मार्गावर सुमारे एक ते डेढ़ फूट खोल खड्डे पडले असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे सर्व्हिस रोडचीही तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उड्डाणपुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू झाली असली, तरी सर्व्हिस रोडच्या दुरुवस्थेकडे संबंधित विभाग कधी लक्ष देणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे