भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : रब्बी हंगामातील धान विक्री करूनही तब्बल वर्षभारापासून चुकािरे न मिळाल्याने एका शेतकऱ्याने जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. धान विक्रीचे पैसे वेळेवर न मिळाल्याने आई-वडिलांवर वेळेत उपचार करता आले नाहीत आणि १५ सप्टेंबर रोजी अवघ्या एका तासाच्या अंतराने आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचा दावा भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील शेतकरी प्रशांत खोब्रागडे यांनी केला. या घटनेच्या वेदना व्यक्त करीत त्यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना आई-वडिलांच्या १४ व्या दिवसाची पत्रिका दिली आणि कार्यालयातच उपस्थित शेतकऱ्यांसोबत आई-वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
सिल्ली येथील प्रशांत खोब्रागडे, त्यांच्या आई इंदिराबाई तसेच कुटुंबातील अन्य एका व्यक्तीच्या नावाने तिड्डी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान्याची विक्री करण्यात आली होती. मे २०२५ मध्ये धान विक्री केल्यानंतर ऑगस्टमध्ये धान्याची नोंद होऊन खरेदीची पावतीही मिळाली. मात्र त्यानंतरही धान्याचे चुकािरे खात्यावर जमा झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तिड्डी येथील या केंद्रावर ९० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी धान विक्री केल्याचे सांगण्यात येत असून, अद्याप एकाही शेतकऱ्याला चुकािरे मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे मिळावेत यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हा पणन अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र प्रत्येक वेळी त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे प्रशांत खोब्रागडे यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशांत यांच्या आई-वडिलांना उपचाराची आवश्यकता असताना धान्याचे पैसे मिळाले नसल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. वेळेत उपचार करता आले नाहीत, असा त्यांचा दावा आहे. अखेर १५ सप्टेंबर रोजी आई-वडिलांचा अवघ्या एका तासाच्या अंतराने मृत्यू झाला. आई-वडिलांना गमावल्याच्या दुःखासोबतच वेळेवर पैसे मिळाले असते तर उपचार करता आले असते, ही खंत प्रशांत यांच्या मनात कायम राहिली.
या घटनेनंतरही धान्याचे पैसे मिळाले नसल्याने प्रशांत खोब्रागडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा संताप वाढला. अखेर त्यांनी जिल्हा पणन अधिकारी कार्यालय गाठून वेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदविला.
प्रशांत खोब्रागडे यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे आंदोलन केवळ धान्याच्या पैशांसाठीचे आंदोलन न राहता, वेळेवर हक्काचे पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडणारे ठरले. आता तरी प्रशासनाने तिड्डी केंद्रावरील सर्व पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित चुकािरे तातडीने देऊन प्रश्न निकाली काढवा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली