खैरीतील ११ सप्टेंबरच्या घटनेचे गांभीर्य वाढले
६२ वर्षीय दिलीप कांबळे यांचा नागपुरात मृत्यू
सरपंचाविरुद्ध गुन्हा; निष्पक्ष तपासाची मागणी
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
साकोली : घरासमोरतील नालीतील कचरा साफ करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या घटनेत जखमी झालेले खैरी येथील ग्रामस्थ दिलीप सदाशिव कांबळे (६२) यांचा नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना २१ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी खैरी-वलमाझरी गट ग्रामपंचायतीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी खैरी येथील रहिवासी दिलीप कांबळे यांनी घरासमोरील नालीतील कचरा साफ करण्यासाठी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांना सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. या घटनेत कांबळे जखमी झाले होते.
उपचाराच्या विलंबासह अनेक प्रश्न ऐरणीवर
घटनेनंतर जखमी कांबळे यांना स्थानिक पातळीवर उपचार, त्यानंतर १३ सप्टेंबरला साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करणे, पुढे भंडारा आणि नागपूर येथे उपचारासाठी हलविणे, या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मारहाणीनंतर स्थानिक पातळीवर नेमका कोणत्या डॉक्टरने उपचार केला? उपचारावेळी दुखापतीचे कारण काय नमूद करण्यात आले? घटनेची पोलिसांना तात्काळ माहिती मिळाली होती का? तसेच घटनास्थळावर उपस्थित व्यक्ती आणि पोलीस पाटील यांच्या भूमिकेबाबत कोणती माहिती समोर येते, याचीही चौकशी करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.
घटनाेनंतर त्यांच्यावर सुरुवातीला स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.२० वाजता कुटूंबीयांनी त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने मेंदूचा सीटी स्कॅन करण्यासाठी त्यांना १३ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजता भंडारा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. उपचारदरम्यान २१ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
कांबळे यांच्या मृत्यूची वार्ता खैरी गावात पसरताच पोलिसांनी प्रकरणाची चौकशी गतिमान केली. दरम्यान, वंचित आघाडी, अस्मितेचा एल्गार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मृतकाच्या कुटूंबियांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाला निवेदने दिली. या संघटनांनी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच नागपूर येथे शवविच्छेदन इन-कॅमेरा पद्धतीने करण्याची, संशयितांशी संबंधित कोणतेही पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, पोलीस पाटील यांच्या घरामसमोर घडलेल्या कथित मारहाणीचे पुरावे तपासणे, ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर कांबळे यांच्यावर स्थानिक पातळीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध घेणे आणि त्यांच्याकडून उपचाराची माहिती घेणे, अशा विविध मागण्या सामाजिक संघटनांनी निवेदनाून केल्या आहेत.
दरमान, पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील कलम १०५, ३५२(२), ३८२ व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. मृत्यूची घटना घडल्यानंतर सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.