भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ७२ वर्षीय महिलेचा मृतदेह आय.एम.आय. हॉलसमोरील डी. मार्टच्या बाजूच्या नाल्यात आढळून आल्याने खळबळ उडाली. राजकुमारी रमेशचंद्र मल्होत्रा, रा. भगतसिंग वॉर्ड, नवीन टाकळी, भंडारा असे मृत महिलेचे नाव आहे. त्या सकाळी फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, आय.एम.आय. हॉलसमोरील डी. मार्टच्या बाजूच्या नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नाल्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. राजकुमारी मल्होत्रा यांची प्रकृती बरी नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्या नाल्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.