पवनी ते कोरंबी-ठाणा खाकसी रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचे ठिय्या आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी ते कोरंबी-ठाणा खाकसी या मागार्ची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून, जंगलातून जाणारा हा मार्ग असल्याने वाघाच्या भीतीचेही वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून मजबूत रस्ता तयार करावा तसेच एसटी बस सेवा सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या नेतृत्वात नागरिकांनी आंदोलन छेडले. कोरंबी रोडवरील गोसे फाटा येथे नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू करून प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी आपल्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. खराब रस्त्यामुळे अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने गावकºयांना दैनंदिन प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

विशेषत: शाळकरी मुली व मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. जंगल परिसरातून रस्ता जात असल्याने वन्यप्राण्यांची, विशेषत: वाघाची भीती निर्माण झाली असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. ‘या रस्त्यावर कितीतरी अपघात झाले आहेत. एखाद्या गंभीर अपघातात जीवितहानी झाली, तर प्रशासन त्या व्यक्तीचा जीव परत देऊ शकते का?’ असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.मागण्या पूर्ण न झाल्यास पवनी तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच ठिय्या आंदोलन तहसील कार्यालयाकडे वळविण्यात आले. आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोरही आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलन उग्र रूप धारण करण्याची शक्यता लक्षात घेऊन पवनीचे नायब तहसीलदार राऊत तसेच पवनी पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रविण डांगे यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. संबंधित विभागातील अधिकाºयांनाही आंदोलनस्थळी बोलाविण्यात आले.

यावेळी एसटी डेपोच्या आगार प्रमुखांनी लवकरच बस सेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलकांना दिले. तसेच जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर. डी. मेश्राम आणि नगरपरिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी १५ दिवसांच्या कालावधीत रस्त्याचे मजबुतीकरण व नूतनीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट करत दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. या आंदोलनात गोसे, कोरंबी आणि ठाणा खाकसी परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *