पूर्व आमदार गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल नगरसेवक शिव शर्मा व राहुल श्रीवासला ५-५ वर्षे कारावास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा मुख्यालयातील कुडवा परिसरात असलेल्या हॉटेल ग्रँडसीता येथे ९ एप्रिल २०१६ रोजी घडलेल्या पूर्व आमदार गोपालदास अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयांच्या मारहाण प्रकरणात जिल्हा अपर सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश-१ ए श्रेणी प्रतिनिधी यांनी नगरसेवक शिवकुमार शंकरलाल शर्मा व राहुल हेमराज श्रीवास या दोघांना प्रत्येकी ५ वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर या प्रकरणातील इतर ४ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. घटनेची पार्श्वभूमी अशी की, ९ एप्रिल २०१६ रोजी पूर्व आमदार गोपालदास अग्रवाल यांनी हॉटेल ग्रँडसीता येथे काँग्रेस कडून पत्रकार परिषद आयोजित केली होती.

पत्रकार परिषदेत येऊन भर दिवसा नगरसेवक शिव शर्मा व राहुल श्रीवास यांनी तेथे धाव घेऊन गोपालदास अग्रवाल, त्यांचे पुत्र विशाल अग्रवाल व इतर कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. यात माजी आमदार गोपालदास अग्रवाल रक्तबंबाळ झाले होते. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात शिव शर्मा यांच्यासह ६ जणांविरोधात भादंवि कलम ३०७, १२०(ब), ३२४, ३२५, २९४, ५०५, २१२ व ३४ नुसार गुन्हा दाखल झाला होता.तत्कालीन पोलीस निरीक्षक नन्नावरे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. गेल्या ५ दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आरोपींना अग्रिम जामीन मिळू नये यासाठी गोपालदास अग्रवाल यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे शिव शमार्ला जामीन मिळू शकला नाही.

कोरोनाकाळात सुप्रीम कोर्टात सुनावणी न झाल्याने शिव शर्मा यांनी स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर होऊन अटक दिली होती. शासनाने या खटल्यासाठी नक्षल गुन्ह्यांचे तज्ज्ञ अ‍ॅड. पी.के. सत्यनाथन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. २५ जून रोजी दुपारी ४ वाजता सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने शिव शर्मा व राहुल श्रीवास यांना दोषी ठरवले. अनमेश उर्फ राज दुबे, गजेंद्र साते, परवेज पटेल व जगजीतसिंग भाटिया यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. निकालानंतर न्यायालय परिसरात उपस्थित पोलिसांनी शिव शर्मा व राहुल श्रीवास यांना ताब्यात घेतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणीनंतर दोघांना भंडारा कारागृहात हलवण्यात येणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *