पोलिसांनी बुजवले महामार्गावरील खड्डे; नागरिक झाले अचंबित

रमाकांत खोब्रागडे/भंडारा पत्रिका तिरोडा : गोंदिया-तिरोडा मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन गंगाझरी पोलिसांनी ‘जनसेवा हीच आमची सेवा’ या उपक्रमांतर्गत स्वत: पुढाकार घेत महामार्गावरील खड्डे बुजवले. पोलिसांचा हा अनोखा उपक्रम पाहून मार्गावरून जाणारे नागरिक अचंबित झाले असून, त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. सालई खुर्द-खापा-तिरोडा-गोंदियाबालाघाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर गंगाधरी परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली होती.

नागरिकांना होत असलेला हा त्रास लक्षात घेऊन गंगाझरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार धीरज राजूरकर यांनी पुढाकार घेत ‘जनसेवा हीच आमची सेवा’ हा उपक्रम राबविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय गवई, पोटदुखे, हवालदार राकेश भुरे, श्रीकांत नागपुरे, जनेवार, राऊत, चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी महामार्गावरील खड्डयांमध्ये खडी व मुरूम टाकून ते व्यवस्थित दाबून बुजविले. पोलीस आपले कायदा-सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावत असतानाच नागरिकांना भेडसावणाºया अडचणींकडेही संवेदनशीलतेने पाहू शकतात, याचा प्रत्यय या उपक्रमातून आला. विशेष म्हणजे, या समस्येबाबत कोणतीही तक्रार प्राप्त होण्याची वाट न पाहता पोलिसांनी स्वत:हून पुढाकार घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महामार्गावरील खड्डे बुजविल्यामुळे वाहनचालकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत झाली असून, संभाव्य अपघाताची शक्यताही कमी झाली आहे. पोलिसांच्या या जनसेवाभावी उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *