भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवरील अमानुष लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष सरकारी वकील नियुक्त करून सदर खटला जलदगती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्टात) चालविण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा, त्यामध्ये फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शासनाने सक्षम न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडून विशेष पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अपर मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
भंडारा शहरात ६ आॅगस्ट रोजी तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्या मुलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. नरसापूर येथील अत्याचाराच्या प्रकरणात ज्या पद्धतीने जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया राबविण्यात आली, त्याच धर्तीवर भंडारा येथील या प्रकरणातही तातडीने आणि प्रभावीपणे न्यायालयीन प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपीची पार्श्वभूमी गंभीर असून त्याच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींचीही दखल घेण्यात यावी, असे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. वारंवार गुन्हेगारी प्रवृत्ती दाखविणाºया आणि विकृत मानसिकतेच्या व्यक्तीविरुद्ध कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक असून, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने, निष्पक्षपणे आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात यावा. तपासादरम्यान आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदी, उपलब्ध पुरावे तसेच प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींची सखोल तपासणी करून त्यांचा कायदेशीर प्रक्रियेनुसार न्यायालयीन कामकाजात योग्य प्रकारे वापर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आरोपीविरुद्ध सर्व संबंधित कठोर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात यावे आणि खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणात शासनातर्फे अनुभवी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडता येईल. तसेच खटल्याची सुनावणी शक्य तितक्या जलदगतीने होण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवून दैनंदिन सुनावणीच्या माध्यमातून लवकरात लवकर निकाल लागण्यासाठी शासनाने विशेष पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोष सिद्ध झाल्यास त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि फाशीची शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सक्षम न्यायालयात प्रभावी व ठाम भूमिका घेऊन सर्वतोपरी पाठपुरावा करावा, असेही आमदार डॉ. फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. अशा अमानुष गुन्ह्यांमध्ये कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे ही समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
यासोबतच पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून तातडीने सर्व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. पीडित बालिकेला आवश्यक वैद्यकीय उपचार, मानसिक आधार व समुपदेशन, कायदेशीर मदत तसेच आवश्यक आर्थिक सहाय्य तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे. या संपूर्ण काळात शासन व प्रशासनाने पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी बालकांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचेही आमदार डॉ. फुके यांनी स्पष्ट केले. बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर व प्रशासकीय यंत्रणांना अधिक सक्षम करणे, संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करणे आणि बालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत संबंधित अपर मुख्य सचिवांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासापासून न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत आवश्यक ती कार्यवाही जलदगतीने होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बालिकेला लवकरात लवकर न्याय मिळावा, आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी शासनस्तरावर ठामपणे पाठपुरावा सुरू ठेवला आहे.