भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत प्रगतीचा संकल्प – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या स्वातंत्र दिनानिमित्त भंडारा जिल्ह्याने ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, कृषी, मत्स्यव्यवसाय, शिक्षण, रोजगार आणि सांस्कृतिक क्षेत्रात भंडारा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण तसेच अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मीरा सतीश मिसाळ यांनी विशेष कौतुक केले. जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित ८० स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी त्या बोलत. यावेळी नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जिल्हाधिकारी सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत ईटगावने दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांतर्गत बालस्नेही पंचायत या राष्ट्रीय पुरस्कारात देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीला एक कोटी रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह मिळाले आहे.

ही बाब जिल्ह्यासाठी अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत खैरी/वलमाझरीने क्लायमेट अ‍ॅक्शन स्पेशल पंचायत वार्ड मध्ये १०० पैकी ९९.५ गुण मिळवत देशात द्वितीय क्रमांक मिळविला याबद्दल श्रीमती मिसाळ यांनी गौरव उद्गार काढले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ११ हजार ६९६ पात्र शेतकºयांच्या खात्यात ७५ कोटी २५ लाख रुपये थेट जमा करण्यात आले. तसेच सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांसाठी १ लाख १४ हजार ५९४ शेतकºयांना ३८० कोटी रुपयांचे वीज देयक अनुदान देण्यात आले. खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये २५४ केंद्रांवर २,३६९ रुपये प्रतिक्विंटल या आधारभूत दराने धान खरेदी करण्यात आली असून सुमारे ८९ हजार शेतकºयांच्या खात्यावर ७५८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १७ हजार ३६३ हेक्टर जलक्षेत्रात १३९ संस्थांच्या ११ हजार ५०० सभासदांना मत्स्य व्यवसायाचा लाभ मिळत आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ९८ प्रस्तावांना मंजुरी देऊन लाभार्थ्यांना १९० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. रोजगार व नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे घेण्यात येत असून आय. आय. एम .नागपूरच्या सहकार्याने बिझनेस फॅसिलिटी सेंटर उभारण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४१ गुणवंत विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील इस्रो संस्थेच्या शैक्षणिक अभ्यासदौºयाची संधी देण्यात आली. करवती टसर सिल्कला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणी तसेच युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळविण्याच्या दृष्टीने कार्य सुरू आहे.

जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीचे बळकटीकरण आणि नवीन बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे वाचन, अध्ययन आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. मतदार पडताळणी मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे विशेष सखोल पुनरीक्षण (रकफ) मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १० लाख १० हजार ७८८ मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी सुरू असून आतापर्यंत ९८ टक्के पडताळणी पूर्ण झाली आहे. प्रारूप मतदार यादी २४ आॅगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.ज्या नागरिकांनी अद्याप गणना पत्र भरलेले नाही, त्यांनी १७ आॅगस्टपर्यंत आपल्या संबंधित बीएलओशी संपर्क साधून गणना पत्र भरून द्यावे, असे आवाहन राज्यमंत्री यांनी केले.

निसर्गसंपन्न भंडारा जिल्ह्याच्या आणि वैनगंगा नदीच्या भूमीत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही जबाबदार सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीमती मिसाळ यांनी यावेळी केले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते जिल्हा युवा पुरस्कार सन २०२६ करिता समाज हिताचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तुमसर येथील दिपाली मते, लाखांदूर येथील जोसेफ वाढई, मानवतावादी कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल १०० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून अनेकांची प्राण वाचवणारे प्रीतम राजाभोज यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच भंडारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती व वैशिष्ट्य प्रभावीपणे मांडणाºया उत्कृष्ट कॉफीटेबल बुक ची निर्मिती केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघदांदळे यांना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस विभागातील अधिकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व गोकुळ सूर्यवंशी, रवींद्र गभणे, धनंजय कुरंजेकर, महेंद्र शहारे यांना उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

जलसंधारणाची शपथ

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने उपस्थित सर्वांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली. जलसंधारण लोगोचे ही अनावरण करण्यात आले. जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद ठवकर,मंजुषा लोदासे यांनी केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *