भंडारा जिल्ह्याात रेती तस्करांवर पोलिसांचा धडाका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात शासनाच्या मालकीच्या रेतीची विनापरवाना वाहतूक व चोरीला आळा घालण्यासाठी भंडारा पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत साकोली, लाखनी आणि तुमसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत चार स्वतंत्र प्रकरणांत टिप्पर, ट्रॅक्टर, जेसीबी व रेती असा एकूण सुमारे ६८ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेतीची अवैध वाहतूक करणाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

साकोलीत दोन कारवायांत ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ आॅगस्ट रोजी उमरी पटाच्या दाणी येथे दुपारी साडेदोनच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. टिप्पर चालक राकेश राजू कापगते (वय २७, रा. उमरी), जेसीबी चालक खिमेश सुरेंद्र रामटेके (वय १९, रा. परसोडी) हे टिप्पर व जेसीबी मालक लालचंद किशन करंजेकर (वय ५०, रा. खंडाळा) यांच्या सांगण्यावरून शासनाच्या मालकीची रेती विनापरवाना वाहतूक करताना आढळून आले. या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचा पिवळ्या रंगाचा टिप्पर, त्यामध्ये असलेली अंदाजे दोन ब्रास रेती तसेच पिवळ्या रंगाची जेसीबी असा एकूण ५० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनांना तहसील कार्यालय साकोली येथे डिटेन करण्यात आले असून, या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात कलम ३०५ (ई), ४९ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जितेंद्र राऊत करीत आहेत.

दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी उमरी ते परसोडी मार्गावर पोलिसांनी आणखी एका रेती वाहतूक करणाºया टिप्परवर कारवाई केली. टिप्पर चालक अमित राजू चौधरी (वय ३०, रा. तलाव वॉर्ड, साकोली), क्लिनर मौसम ईश्वर वरकडे (वय २५) तसेच टिप्पर मालक ओमप्रकाश उर्फ गोलू धुर्वे (वय ३०, रा. उमरी) यांच्या सांगण्यावरून रेतीची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचा पिवळ्या रंगाचा टिप्पर व त्यामधील अंदाजेदोन ब्रास रेती असा एकूण २० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात कलम ३०५ (ई), ४९ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अर्जुन बेडवाल करीत आहेत.

लाखनीत रेती वाहतुकीवर कारवाई

लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ आॅगस्ट रोजी केसलवाडा फाटा येथे दुपारी पावणेचार ते पावणेपाचच्या दरम्यान पोलिसांनी ट्रॅक्टरवर कारवाई केली. ट्रॅक्टर चालक रंजीत प्रकाश जांभुळकर (वय ३३, रा. चिचोली, ता. लाखांदूर) हा ट्रॅक्टर मालक रामप्रकाश कौडुजी बारापात्रे (वय ४९, रा. बेसा चौक, नागपूर; हल्ली सावरी, ता. लाखनी) यांच्या सांगण्यावरून शासनाच्या मालकीची रेती विनापरवाना वाहतूक करताना आढळला.या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचा पिवळ्या रंगाचा वाहन व त्यामधील अंदाजे दोन ब्रास रेती असा २० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात कलम ३०५ (ई), ४९ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा प्रतीक बोरकर करीत आहेत.

तुमसरमध्ये ट्रॅक्टरसह रेती जप्त

तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ आॅगस्ट रोजी सकाळी कोष्टी शिवनी पांदण रोडवर पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणाºया ट्रॅक्टरवर कारवाई केली. सोमेश्वर मुन्ना मारबदे (वय २६, रा. उमरवाडा, ता. तुमसर) हा कोणताही पास अथवा रॉयल्टी परवाना नसताना रेतीची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून निळ्या रंगाचा स्वराज ट्रॅक्टर, ट्रॉली आणि त्यामध्येअसलेली अंदाजे एक ब्रास रेती असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२) भा.न्या.सं. सहकलम २३९/१७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि साखरे करीत आहेत.

रेती तस्करीविरोधात कारवाई तीव्र

जिल्ह्यातील विविध भागांत शासनाच्या मालकीच्या रेतीची चोरी व विनापरवाना वाहतूक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला आहे. अवैध रेती वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या कारवायांमधून पोलिसांनी एकूण चार प्रकरणांत अंदाजे ६८ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शासनाचा महसूल बुडवून रेतीची अवैध वाहतूक करणाºयांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *