भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आजच्या तरुण पिढीमध्ये संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट निर्मिती तसेच यूट्यूब व डिजिटल माध्यमांबाबत विशेष आकर्षण निर्माण होत आहे. आधुनिक युगात मनोरंजन क्षेत्रातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत असल्याने युवकयुवतींना या क्षेत्राची ओळख व प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने कलापथक टीम भंडारा च्या वतीने सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात दोन दिवसीय थिएटर कार्यशाळेचे (वर्कशॉपचे) उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, नगर परिषद भंडाराच्या नगराध्यक्ष मधुराताई मदनकर, सहायक पोलीस निरीक्षक सुरेन्द्र राऊत,भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, नगरसेविका लक्ष्मीताई भागवत, डॉ. यशवंत लांजेवार, महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा चांदेकर, मेधा भागवत, डॉ. ओमप्रकाश गिºहेपुंजे, डॉ. आशिष सावरकर (ब्लेस हॉस्पिटल, मौदा), पोलीस विभागातील सुरेंद्र राऊत, नगरसेवक नितीन गायधने, कॅप्टन विनोद गवरे, डॉ. तन्नू गवरे, हैदराबाद फिल्म सिटी येथील तज्ज्ञ व सुप्रसिद्ध सिनेकर्ते तसेच पुष्पा-१ व पुष्पा-२ चित्रपटांचे कोरिओग्राफर श्री. सागर चव्हाण, भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, कोरिओग्राफर व मीडिया उद्योजक हनी खट्टर, सुप्रसिद्ध डान्स ट्रेनर व एडिटर दीप अंबुले, डीओपी सिनेमॅटोग्राफर रोहित दुधबर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन, नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विशेष अतिथी म्हणून भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, सुप्रसिद्ध अँकर परेश, मोहित जगणे तसेच जिद्दी कलाकार टीमचे सदस्य उपस्थित होते.