भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी सौ. प्रियांका नारनवरे तथा पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात यापूर्वी दिनांक ५ जून २०२६ ते दि. १५ जून २०२६ या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावी मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दि. १ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये आतापर्यंत ११० वाहनांवर कारवाई करुन २.९२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार एस.टी. महामंडळाच्या बसस्थानकापासून २०० मीटर परिसरात खाजगी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी करून प्रवाशांची चढ-उतार करणे प्रतिबंधित आहे. या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भंडारा विभागात व्यापक संयुक्त कारवाई करण्यात आली. सुरक्षा व दक्षता अधिकारी मोहन कानफाडे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी शितल शिरसाट, सुरक्षा निरीक्षकहरीश इंगोले, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक सुवर्णा सुरजुसे, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक शेषराव धनभाते तसेच विभागातील सर्व आगार व्यवस्थापक यांनी वाहतूक पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या समन्वयाने ही मोहीम यशस्वीपणे राबविली. या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस विभाग व आरटीओ यांच्या संयुक्त कारवाईत ११० अवैध प्रवासी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण २,९२,०५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. संपूर्ण मोहिमेदरम्यान विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून कारवाईचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.