गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका
भंडारा : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भंडारा शहराची ओळख आता विविध नागरी समस्यांसोबतच वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चाेत येत आहे, शहरात खून, बलात्कार, चोरी, मारामारी यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे, त्यातच तरुणांमध्ये वाढत असलेले व्यसनाधीनतेचे प्रमाण शहरवासीयासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे भंडारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण, असा प्रश्न सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही कालावधीत भंडारा शहरात विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः तरुण आणि अल्पवयीन मुलांचा काही प्रमाणात गुन्हेगारीकडे वाढत असलेला कल ही भविष्याची धोक्याची घंटा मानली जात आहे.
नशेच्या विळख्यात तरुणई शहरातील काही भागांमध्ये गांजा, दारू तसेच इतर अमली पदार्थांच्या वापराबद्दल नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर घटनांमध्ये होण्याची शक्यता वाटते. व्यसनाधीनतेमुळे तरुणांचे शिक्षण, रोजगार आणि कौटुंबिक जीवनही प्रभावित होत असून त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
अल्पवयीन मुलेही चुकीच्या संगतीला लागून व्यसनाच्या आहारी जाण्याची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या संपर्कात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि परिसरात व्यसनमुक्ती तसेच जनजागृती अभियान राबविण्याची गरज आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाही गुन्हेगारी रोखण्याची प्राथमिक जबाबदारी पोलीस प्रशासनाची असली तरी केवळ पोलिसांच्या कारवाई हा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही. पोलीस प्रशासन, स्थानीय प्रशासन, पालक, शिक्षक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
अमली पदार्थांची विक्री करणारे, अवैध धंदे चालविणारे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रोत्साहन देणाऱ्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच शहरातील संवेदनशील भागांमध्ये नियमित पोलीस गस्त वाढविणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज पूर्वी मुलांकडून चूक झाल्यास पालक त्यांना समज देत असत. चुकीच्या वर्तनावर वेळीच नियंत्रण आ於ले जात असे. मात्र आज अनेक पालक मुलाप्रत्येक कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात, अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलांच्या संगतीकडे, त्यांच्या वर्तनातील बदलांकडे आणि त्यांच्या दैनंदिन हालचालींकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
मुलगा किंवा मुलगी चुकीच्या मार्गावर जात असल्याचे लक्षात आल्यास त्यांना वेळेची समज देणे, आवश्यक असल्यास शिक्षक किंवा समुपदेशकांची मदत घेणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना केवळ आर्थिक सुविधा दिल्यापेक्षा त्यांच्यासोबत संवाद साधण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
पोलिसांच्या प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष भंडारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुन्हा घडल्यानंतर आरोपीवर कारवाई होणे आवश्यक आहे; मात्र त्यापेक्षा गुन्हा घडण्यापूर्वीचे प्रतिबंधत्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे अधिक महत्त्वाचे आहे.
शहरातील अवैध धंदे, अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर दारू विक्री तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांनी सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी तसेच संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होऊ शकते.
‘खुनी भंडारा’ अशी ओळख निर्माण होऊ नये भंडारा शहराची ओळख पूर्वी तलावांचे शहर म्हणून होती, त्यानंतर खराब रस्ते आणि नागरी समस्यांमुळे शहराची चर्चा झाली. आता गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे शहराबाबत नकारात्मक चर्चा होणे ही नागरिकांसाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. सोशल मीडियावर किंवा नागरिकांच्या चर्चेत शहराला ‘खुनी भंडारा’ अशी उपरोधित ओळख मिळणे ही परिस्थिती बदलण्याची गरज अधोरेखित करते.
भंडारा शहराची ओळख गुन्हेगारीसाठी नखे तर सुरक्षित, सुंदर आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे शहर म्हणून व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.
गुन्हेगारीच्या मूळावर घाव घालण्याची गरज गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यासोबतच गुन्हेगारीची करणे शोधणे आवश्यक आहे. व्यसनाधीनता, बेरोजगारी, चुकीची संगत, कौटुंबिक दुर्लक्ष, सोशल मीडियाचा गैरवापर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा प्रभाव या बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष मोहीम राबवून अमली पदार्थांच्या विक्रीवर अंकुश, अवैध धंद्यांवर कारवाई, संवेदनशील भागात गस्त, सीसीटीव्हीची प्रभावी अंमलबजावणी आणि अल्पवयीन मुलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
भंडारा शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, मात्र त्याचवेळी पलक, नागरिक आणि समाजाची जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. वाढत्या गुन्हेगारीला वेळेच आळा घातला नाही, तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आता ठोस आणि परिणामकारक पावले उचलवावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.