मडेघाट फाटा-पुयार रस्त्याच्या नूतनीकरणासाठी रास्ता रोको; प्रशासनाचे लेखी आश्वासन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : मडेघाट फाटा ते पुयार या सुमारे सात किलोमीटर लांबीच्या प्रमुख मार्गाची झालेली दुरवस्था आणि रखडलेल्या नूतनीकरणाच्या प्रश्नावर अखेर नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरला. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि.१८ आॅगस्ट ला मडेघाट फाटा येथे सर्व पक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच परिसरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले. मडेघाट फाटा-कन्हाळगाव-पुयार हा परिसरातील दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असून अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याने वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला असून दैनंदिन वाहतुकीवरही मोठा परिणाम होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी ५ मे २०२६ रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने युवक काँग्रेसने रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लाखांदूरचे ठाणेदार गिरीष भालेराव यांनी वरिष्ठ पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुमारे ४० ते ५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर विभागाच्या लाखांदूर उपविभागीय कार्यालयाकडून दिलेल्या लेखी पत्रात, रस्त्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा विचाराधीन असून डिसेंबर २०२६ च्या हिवाळी अधिवेशनात सदर कामास मंजुरी घेऊन पुढील तांत्रिक बाबी पूर्ण करून डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी पुढील भूमिका प्रशासनाच्या कार्यवाहीवर अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट केले.

या आंदोलनामुळे मडेघाट फाटा-पुयार रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा प्रशासनाच्या केंद्रस्थानी आला आहे. आता दिलेल्या लेखी आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते आणि रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होते, याकडे मडेघाट, कन्हाळगाव, पुयारसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रकाश देशमुख म्हणाले, ‘मडेघाट फाटा ते पुयार या रस्त्याची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५ मे रोजी प्रशासनाला निवेदन देऊनही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. आता प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असून, त्याची ठोस अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. हा नागरिकांच्या हक्काचा प्रश्न आहे.’ लेखी आश्वासनामुळे आंदोलनाला यश मिळाले असले तरी आता आश्वासनाच्या पूर्ततेची वेळ आली असून, प्रशासन प्रत्यक्ष कामाला कितपत गती देते, यावरच या आंदोलनाचे खरे फलित ठरणार आहे. यावेळी सरपंच शैलेश रामटेके पुयार, सरपंच प्रशांत चौधरी कन्हाळगाव, सरपंच अंमल हुमणे मड़ेघाट, नीकेश दिवठे, आशिष शहारे, सौरभ राऊत, सुधाकर मेश्राम, अजय रामटेके, सुभाष ढोरे, यशवंत ठाकरे, अरविंद भागडकर, दिगंबर बगमारे, संदीप नाकतोडे, चेतन अलोने, प्रणय लांडगे, करण सुतार, दादाजी दूरबुळे, वासुदेव वलथरे, बालू तुपटे, सुनील गायकवाड, रुशेंद्र ठाकरे, नानू राऊत, हर्षल अलोने यासह सर्व पक्षीय असंख्य उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *