भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील मुंडीकोटा शिक्षण प्रसारक संस्था आणि संस्थेमार्फत चालविण्यात येणाºया सुभाष विद्यालयातील कथित गैरप्रकारांची एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार तिरोडा यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात संस्थेच्या कारभाराबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संस्थेच्या विद्यमान संचालकांनी चेंज रिपोर्ट सादर न करता संबंधित अधिकाºयांच्या संगनमताने आपल्या कुटुंबातील सदस्यांना नियमबाह्य पद्धतीने नोकºया दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शिक्षण विभाग, धमार्दाय आयुक्त कार्यालय आणि इतर संबंधित अधिकाºयांनीही या कथित गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, ६ सप्टेंबर १९७८ पासून संस्थेच्या कार्यकारी मंडळातील कोणतेही अधिकृत बदल नोंदविले गेलेले नाहीत. संस्थेच्या मूळ कार्यकारी मंडळातील अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व संचालक यांचे निधन झाल्यानंतरही नवीन कार्यकारी मंडळाची वैध नोंद करण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असतानाही संस्था कार्यरत असल्याचे दाखवून विविध प्रशासकीय मंजुरी मिळविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय सहाय्यक धर्मादाय आयुक्त, गोंदिया कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करून संस्थेला मान्यता देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संस्थेच्या नावावर सादर करण्यात आलेले लेखापरीक्षण (आॅडिट) अहवाल, कार्यकारी मंडळाची माहिती आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या माध्यमातून शासनाची तसेच विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल झाल्याचा आरोप निवेदनात नमूद करण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या नावावर शिक्षक भरती प्रक्रियेतही कथित अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींना लाभ मिळावा, यासाठी नियमबाह्य पद्धतीने चेंज रिपोर्ट दाखविण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदार एन. एम. ठाकरे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.