युवकाची हत्या ३ विधीसंघर्षित बालक ताब्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील काचेवाणी रेल्वे गेटजवळील फकीरटोली येथील १८ वर्षीय युवकाचा मृतदेह बेरडीपार (काचेवाणी) येथील स्मशानघाटाजवळ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृताच्या गळ्यावर, पाठीवर व पायावर जखमा आढळून आल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. तपासादरम्यान तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, जुन्या भांडणाच्या कारणावरून हत्या केल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतकाची ओळख मोहम्मद इकबाल फकीर (वय १८, रा. फकीरटोली, काचेवाणी रेल्वे गेट) अशी झाली आहे. ८ आॅगस्ट रोजी सकाळी तो घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. दुसºया दिवशी ९ आॅगस्ट रोजी बेरडीपार येथील स्मशानघाटाजवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच गंगाझरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज राजूरकर पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

याप्रकरणी नुरी इकबाल फकीर (वय ४०, रा. रेल्वे गेट, काचेवाणी) यांच्या तक्रारीवरून सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक अजितराव धाराव यांनी तपास सुरू केला. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी तिरोडा गुल्हाने तसेच स्थानिक गुन्हे शाखा, गोंदियाचे पोलिस निरीक्षक सिंगनजुडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. मृताच्या गळ्यावर, पाठीवर व पायावर जखमा असल्याचे निदर्शनास आल्याने धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केल्याचा संशय बळावला. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता गोंडीटोला व काचेवाणी रेल्वे गेट परिसरातील तीन विधीसंघर्षित बालकांवर संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणावरून मोहम्मद इकबाल याची हत्या केल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. यानंतर पोलिस उपनिरीक्षक अजितराव धाराव यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), ६१ (२) व ३ (५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा गंगाझरीचे ठाणेदार धीरज राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *